श्री विठ्ठल मंदिर उत्सव मंडळ, मालगुंड
श्री विठ्ठल मंदिर मालगुंड येथे केळकर मंडळी साजरा करीत असलेल्या श्री रामजन्मोत्सवाचे पूर्वेतिहास व माहिती. (सदर उत्सव गेली 128 वर्षे नियमित चालू आहे.)
या उत्सवाचे मूळ जनक ‘श्री संत वामनजी महाराज’ यांचा जन्म सुमारे 180 वर्षांपूर्वी आपले मालगुंड गांवी ‘केळकर’ घराण्यात झाला. यांचे घर मराठी शाळेजवळ पूर्वेच्या बाजूस होते. लहानपणापासून त्यांचा ओढा परमार्थ विषयाकडेच होता. ‘श्रीराम’ हे दैवत त्यांनी मानले होते. ते त्याचीच भक्तीभावाने पूजा-अर्चा वगैरे करीत. त्याकाळी शिक्षणाच्या सोई आजच्या सारख्या नव्हत्या. घरी वडील जे काय शिक्षण देतील त्यावरच सर्व आयुष्याची मदार असे. त्यांची प्रकृती चांगली निकोप होती. शरीर मजबूत, डोळे पाणीदार, वर्ण किंचित सावळा होता. ब्राह्मण मुलाला त्याकाळी जे शिक्षण मिळणे जरूर असे तेवढे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे वडील वारल्यावर निर्वाह कसा करावा हा प्रश्न पडला म्हणून किर्तनाचा व्यवसाय करावा, धर्माचे शिक्षण जनतेला द्यावे व त्यावर निर्वाह करावा असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे ते मार्गाला लागले. त्याचा आवाज खडा होता. दृष्टी भेदक त्यामुळे त्यांची दुसऱ्या माणसावर ताबडतोब छाप पडे. पुढे त्यांचे लग्न झाले. दोन मुलेही झाली. एक मुलगी एक मुलगा.
ते अनेक गांवी जात. तेथील ग्रामस्थांना भेटून कीर्तन करीत. त्यांच्या झोळीत देवादिकांच्या तांब्या पितळाच्या मूर्ती असत. त्या मांडून त्यांच्यापुढे कीर्तन करीत. ग्रामस्थ त्यांना काहीतरी बिदागी देऊन ते पुढच्या गांवी जात. या धंद्यावरच त्यांचा निर्वाह चाले. त्यावेळी आजच्या सारख्या नोकऱ्या नव्हत्या. इंग्रजांचे राज्य सुरू झाले होते. शिक्षणाच्या शाळा मोठ्या गांवात चालू झाल्या होत्या. असो.
असे कित्येक दिवस गेले. एकदा बुवा या गावात आले असता ग्रामस्थ त्यांना भेटण्यास गेले व म्हणाले की, बुवा तुम्ही अनेक गावात जाता. कीर्तन करता, तेथे उत्सव सुरू होतो. पण आमच्या गावात मात्र तसे घडून येत नाही. तरी तुम्ही आमचे गांवी कीर्तन सेवा सुरू करावी अशी आमची विनंती आहे. बुवानी ग्रामस्थांची ही विनंती मान्य केली. त्याप्रमाणे ‘श्रीराम’ जन्माचा उत्सव ‘श्री रामेश्वर’ मंदिरात दरसाल चैत्र महिन्यात सुरू झाला.
बुवांच्या झोळीत असलेल्या त्या मूर्ती सिंहासनावर मांडाव्या व पुढे कीर्तन करावे असा क्रम चालू झाला. अशी पुष्कळ वर्षे गेली. कीर्तन चालू असे तो पर्यंत बुवा दिवसभर उपास करीत. रात्री कीर्तन झाल्यावर भोजन करीत. असा क्रम 15 दिवस चालत असे. हा उत्सव श्री विष्णूचा असल्यामुळे दहीकाला झाल्याशिवाय उत्सव पुरा होत नव्हता म्हणून द्वादशी पर्यंत नंतर हनुमान जयंती लगेच असल्यामुळे पूर्ण 15 दिवस कीर्तन चाले. वद्यप्रतिपदेचे दिवशी प्रसाद होऊन रात्री लळीत झाल्यावर उत्सव समाप्त होई. ग्रामस्थ गावात भिक्षा मागून हा चालवीत असत. नवमीचे दिवशी गावात सर्वांनी भिक्षेला झोळी घेऊन मिळेल ती भिक्षा तसेच द्रव्य गोळा करीत व समारत्न करीत. खर्च जास्ता लागला तर ग्रामस्थ आपापसात वाटून घेत. या कामी गावातील मराठे (खोत) मंडळी सहभागी असून त्यांच्या व ब्राह्मण लोकांच्या सल्लामसलतीप्रमाणे उत्सवाचे काम चालत असे. तो काळ फास स्वस्ताईचा होता. स्वस्ताई असल्यामुळे खर्च फार थोडा येत असे.
बुवांची ईश्वरावरची भक्ती किती श्रेष्ठ दर्जाची होती. ते कोणत्या प्रकारचे संत होते, ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय? हे त्यांनी त्या ठिकाणी दोन वेळा लोकांच्या नजरेस आणून दिले.
एकदा कीर्तन चालू होते. बुवा व मंडळी रंगात आली होती. कीर्तन वाढत चालले. असे असता लामण दिव्यातील तेल संपत आले. वाती पाहाणारा गुरव किंचित काळजीत पडला. त्याने वाती पुढे केल्या असता त्याला वाटले की कीर्तन पुरे होण्याआधी दिवे जाणार. तेथील मंडळींची कुजबुज सुरू झाली ते पाहून बुवा म्हणाले काय झालं? काय केलंत? तेव्हा मंडळी म्हणाली की तेल संपत आले आहे तरी कीर्तन आटोपते घ्या. महाराज म्हणाले, एवढंच ना! ‘मग माझा कमंडलू इकडे द्या त्यात तेल आहे.’ लोकांना आश्चर्य वाटले. त्यांनी कमंडलू आणून त्यांच्यापुढे ठेवला. त्यांनी त्यावर आपली छाटी घातली काही प्रार्थना केली. आणि म्हणाले, ‘हे घ्या तेल घाला दिव्यात कीर्तन आटपल्याशिवाय दिवे जाणार नाहीत.’ गुरवाने ते तेल (पाणी होते) घातले आणि काय आश्चर्य ते पाणी जळून कीर्तन होईपर्यंत दिवे गेले नाहीत.
हा चमत्कार पाहून मंडळी चकीत झाली. बुवाचे सामर्थ्य किती अचाट आहे हे दिसून आले.
अशीच एक दुसरी गोष्ट....
एकदा रामेश्वराच्या देवळात उत्सवाची समाराधना होती. जेवणाची पाने वाढून झाली पण अन्न शुद्धीसाठी तूप नव्हते. गडी तूप आणण्यासाठी परगांवी गेला होता. तो वेळेवर आला नव्हता. म्हणून मंडळी थोडावेळ थांबली. बुवांना हे कळेल. त्यावर ते म्हणाले, मंडळी का थांबली आहे? त्यावर एक जण म्हणाला, तूप आलेले नाही. इतक्यात येईल. बुवा म्हणाले, थांबण्याचे कारण नाही. त्यांनी एका कळशीतून आडातले पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी ती कळशी घेतली त्यावर आपली छाटी घातली. ‘श्रीरामाची’ प्रार्थना केली व म्हणाले हे तूप वाढा. तूप आल्यावर जितके उसने घेतले असेल तितके आडात (विहिरीत) टाका म्हणजे झाले. हा चमत्कार पाहिल्यावर मंडळी समजली. बुवा काही सामान्य माणूस नसून एक थोर संत आहेत.
एका गावी उत्सवाची सांगता होती, जेवण तयार होत होते. मंडळी काम करीत होती. इतक्यात एका टवाळांचे टोळके तेथे आले. त्यातील एक जण बुवांना म्हणाला ‘बुवा तुम्ही वेदांत सांग, ईश्वरी सत्तेच्या गोष्टी सांगता तर या तळणीतले वडे तुम्ही हाताने काढाल काय?’ बुवा म्हणाले, त्यात काय आहे? श्रीरामाची इच्छा असली तर ते ही करीन. पण ते हातात तुम्ही घ्याल का? हो – हो घेऊ की, टवाळांना वाटले की हे अशक्य आहे तेव्हा हो का म्हणू नये म्हणून हो – हो म्हटले. आणि काय चमत्कार सांगावा बुवांनी क्षणभर श्रीरामांची प्रार्थना केली आणि चटकन तळणीत हात घालून एक वडा तेलासह बाहेर काढला आणि त्या कुटाळांच्या हातावर धर – धर म्हणून देण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून ती मंडळी घाबरून गेली. बुवांना साष्टांग नमस्कार घातला व पुन्हा अशी थट्टा कधीही न करण्याचे कबुल केले.
आता आणखी एक गोष्ट नमूद करून ही गोष्ट पुरी करतो. एकदा काय झाले बुवा ठिकठिकाणी फिरत असता एका ठिकाणी एका वाण्याच्या घरी भिक्षेसाठी गेले. घरात एक वृद्ध बाई होती. ‘जय जय रघुवीर समर्थ!’ असे म्हणता ती बाई भिक्षा घेऊन आली. भिक्षा झोळीत नेऊन घातली. नंतर हात जोडून म्हणाली बुवा या दारात फणस आहे. फार मोठा आहे पण इतके वर्षात त्यावर एकही फळ नाही. जर तो लागला असता तर माझ्या सारख्या गरीबाला थोडी मदत झाली असती. बुवांनी क्षणभर विचार केला आणि बाईंना म्हणाले, ‘आजीबाई ठीक आहे. मी त्याला सांगून पाहातो.’ बाईला वाटले झाडाला काय ऐकता येते. पण बुवांनी झोळीतील चिमुटभर विभुती काढली ती घेऊन ते फणसाच्या झाडाजवळ गेले. त्याला ती विभुती लावली अलिंगन दिले. आणि कानात सांगावे तसे त्या झाडाला सांगितले, ‘बा वृक्ष पुरुषा तू जन्माला आला आहेस असे कर.’ बाई हे ऐकतच होती. तिला आश्चर्य वाटले. पुढे बुवा निघून गेले. दुसरे वर्षी फळांचा हंगाम आला आणि चमत्कार असा झाला की तो फणस नखशिकांत फुटला. शेकडो फणस त्याला लागले. बाईला आनंद झाला. योगायोगाने त्याच गांवी बुवा पुन्हा दुसरे वर्षी आले व त्या बाईच्या घरी भिक्षेला गेले. बाई आनंदाने पुढे आली व नमस्कार करून म्हणाली, ‘महाराज आपण हे काय अघटीत केले. माझा फणस भरपूर लागला, यंदा त्यावर खूप फळे धरली होती ही आपली कृपा.’ पुढे तोच फणस दरसाल लागू लागला. असो.
आता ही चमत्काराची माहिती येथेच पुरी करून दुसऱ्या गोष्टींकडे वळूया.
या गावातील सर्व मंडळी सहभागी असल्याने महाराजांनी चालू केलेला रामेश्वर मंदिरातील उत्सव चांगला चाले. पुढे बुवा वृद्ध झालेवर ते वेतोशी गावात आपल्या मुलीकडे गेले. तेथे त्यांनी समाधी घेतली. ती समाधी वेतोशी गांवी श्री व्यंकटेश मंदिराजवळ आहे.
उत्सव चांगला चालत होता. कालांतराने येथील केळकर मंडळी व गावातील इतर मंडळी यांचे काही कारणाने पटेनासे झाले व त्यामुळे केळकर मंडळींनी एकत्र येऊन आपण निराळा उत्सव सुरु करावा असे ठरविले आणि एकदा रामनवमीचा उत्सव चालू असता संपूर्ण गावची मंडळी एकत्र जमली असता ऐनवेळी कै.विठोबा केळकर यांनी उत्सव मूर्ती उचलून त्या या ठिकाणी आणल्या. कारण त्या मूर्ती आमच्या स्वामींच्या होत्या. त्यावर इतर गावचा काही हक्क नव्हता. त्यामुळे कोणीही प्रतिकार केला नाही. तोच हा विठ्ठल मंदिरात सुरू झालेला उत्सव. ‘जय जय रघुवीर समर्थ’.
मूर्ती आणल्या पण त्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडला. त्याचवेळी श्री.कै.वासुतात्या केळकर, श्री.कै.बाळा भाऊ बापट यांनी आपल्या जमिनीवर या मूर्ती ठेवण्यास परवानगी दिली. मांडव घालून उत्सव सुरु झाला. त्याच ठिकाणी एक साधे देऊळ उभारले गेले व समारंभाने मूर्ती स्थापन करुन मंडळी धन्य झाली. कारण हे एक मंडळींनी केलेले दिव्य होते. नंतर दरसाल हा उत्सव येथेच सुरु आहे. या उत्सवासाठी कै.गोविंद विनायक केळकर, कै.शंकर बाळाजी केळकर, कै.शिवराम विनायक केळकर, कै.वासुदेव चिंतामण केळकर वगैरे समकालीन मंडळींनी तसेच पुढे सर्व केळकर मंडळींनी तन-मन-धनाने या उत्सावाला स्थैर्य प्राप्त करून दिले.
‘जय जय रघुवीर समर्थ’
श्री विठ्ठल मंदिरात केळकर मंडळी साजरा करीत असलेल्या श्रीराम जन्मोत्सवाचे 16 दिवसांचे कालावधीत (चैत्र शु. प्रतिपदा ते चैत्र वद्य प्रतिपदा) रोज साजरे केले जाणारे कार्यक्रम –
गुढीपाडवा :
उत्सवाची सुरुवात चैत्र शु. प्रतिपदेपासून होते. सकाळी देवळाजवळ गुढी उभारली जाते व पुजाऱ्याकडून गुढीची पूजा केली जाते. सकाळी 10 वाजता सर्व मंडळी देवळात जमून प्रभू रामाची प्रार्थना करुन मनाचा श्लोक म्हणून झोळी घेऊन धान्य भिक्षा मागण्यासाठी गावातील ब्राह्मणांचे घरी जातात. यावेळी प्रत्येक घरी मनाचा श्लोक म्हटला जातो व ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणून दिलेली धान्य भिक्षा घेतात. त्यानंतर मंदिरात परत येऊन श्लोक म्हणून प्रभूरामाचा व प.पू.वामन सद्गुरूंचा जयजयकार केला जातो. रात्री 9 वाजता मंडळी आरत्या, भोवत्यांसाठी पुन्हा मंदिरात एकत्र येतात. आरत्यानंतर 5 भोवत्या मंदिराभोवती घातल्या जातात. प्रत्येक भोवतीचे शेवटी गजर व श्लोक होते. फक्त पहिल्या भोवतीच्यावेळी मारुतीच्या घुमटीसमोर मारुतीची आरती, तुळशीजवळ तुळशीची आरती, गरुडाच्या घुमटीजवळ अनंताची आरती म्हटली जाते. पाचव्या भोवतीनंतर ‘घालिती पंखा वारा हरि तुम्ही चला हो मंदिरा’ हे भजन म्हणत मंदिरात येऊन फेर धरला जातो. त्यानंतर बसून भजने म्हटली जातात. पुढे देवे म्हणून प्रसाद दिला जातो व या दिवसाचा कार्यक्रम संपतो.
असाच कार्यक्रम आरत्या, भोवत्या, भजने, देवे वगैरे सोळा दिवस दररोज चालू असतो.
रामनवमी उत्सव :
रामनवमीचे दिवशी सकाळी मंडळी मंदिरात एकत्र येतात. सभामंडपात देवाच्या मूर्ती सिंहासन मांडून सजावट करुन त्यावर ठेवल्या जातात. नंतर 11 वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन सुरु होते. गावकऱ्यांना (सर्व ब्राह्मण मंडळींना) आगाऊ निमंत्रण केलेले असते. त्यामुळे सर्व मंडळी वेळेवर जमतात. 12 वाजता श्रीरामाचा जन्म होऊन देव पाळण्यात घालतात. पाळण्यातील बाल रामाची न्हाणं, पूजा करुन सुवासिनी श्रीरामाला पाळणा म्हणतात. नंतर पाळण्यातील देव सर्व भक्तांना भेटवतात. प्रसाद सुंठवडा वाटला जातो. त्यानंतर पाच भोवत्या सभामंडपात मूर्तीला व एक भोवती मंदिराभोवती घालताना मारुतीची आरती, तुळशीची आरती, अनंताची, शंकराची व देवीची आरती म्हणून भोवती पूर्ण होते. कीर्तनकारबुवा श्री प्रभूरामांची प्रार्थना करतात व कार्यक्रम संपतो. दुपारी 3।। वाजता मंडळी पुन्हा देवळात जमून प्रार्थना व श्लोक म्हणून सर्व गावात ब्राह्मणांचे घरी द्रव्य भिक्षेसाठी फिरतात. यावेळीही घरोघरी श्लोक व ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणून द्रव्य भिक्षा घेऊन देवळात परत येऊन श्लोक म्हणून प्रभू रामांचा व प.पू.वामन सद्गुरुंचा जयजयकार करून घरी परततात. रात्रौ 9 वाजता मंदिरात आरत्या, भोवत्या, भजन, देवे नंतर बुवांचे कीर्तन असा 12 वाजेपर्यंत कार्यक्रम होतो. प्रसाद देऊन कार्यक्रम संपतो.
दहिकाला :
चैत्र शु. द्वादशीला दहिकाला साजरा केला जातो. संध्याकाळी 5 वाजता मंडळी जमतात. सभामंडपात देवांच्या मूर्ती सिंहासनावर सजावट करुन मांडल्या जातात. त्यानंतर बुवा कीर्तन सुरु करतात. कीतर्नाचा पूर्वरंग झाला की, बुवा बाळगोपाळांना खेळ खेळण्यासाठी ‘गोपाळ हो’ अशी साद घालतात. बाळगोपाळ मंडळी निरनिराळे खेळ उच उडी, बैठका, नमस्कार, हुतूतू, जोर, गोल फेरी वगैरे खेळतात व शेवटी दहीहंडी फोडतात. दहीहंडी फोडण्यासाठी जाण्यापूर्वी कीर्तनाची समाप्ती करुन आरती घेऊन मारुतीची आरती केल्यावर दहीहंडी फोडली जाते. नंतर आरती घेऊन देवळाभोवती एक भोवती घातली जाते. भोवती घालताना तुळशीची आरती विहिरीजवळ शंकराची आरती करुनच जलदेवतांची प्रार्थना करुन नारळ फोडून पुढे अनंताची, शंकराची, देवीची आरती करून भोवती पूर्ण होते. शेवटी बुवा सर्वांच्या हितचिंतनाची व केलेल्या कार्यक्रमाच्या सांगतेची प्रभू रामाची प्रार्थना करतात. दहीपोह्यांचा प्रसाद वाटून कार्यक्रम संपतो.
हनुमान जयंती :
चैत्र शु. पौर्णिमेला श्री हनुमानाचा जन्म साजरा केला जातो. सकाळी 6 वाजता मंडळी देवळात जमतात. नंतर बुवा हनुमान जन्म आख्यान सांगतात. बरोबर सूर्योदयाचे वेळी श्री हनुमानाचा जन्म साजरा होतो. त्यानंतर बुवा शक्तीदेवता हनुमानाची प्रार्थना करतात. प्रसाद म्हणून चणे व खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता होते.
समाराधनाचा समाप्ती दिवस :
चैत्र वद्य प्रतिपदेचे दिवशी समाराधना असल्यामुळे स्त्री, पुरुष मंडळी सकाळी 8 वाजता देऊळात येऊन जेवणाचे तयारीला लागतात. गावातील सर्व ब्राह्मण मंडळीला प्रसादाचे बोलावणे आगाऊच केलेले असते. दु. 12।। वाजता जेवण तयार झालेवर राशीची पूजा केली जाते. देवांचे नैवेद्य तयार करुन ते देवतांना अर्पण केले जातात. नंतर सर्व भक्तगणांना प्रसादाचे जेवण दिले जाते. हल्ली भक्त निरनिराळी पक्वान्ने त्यादिवशी जेवणाच्या प्रसादामध्ये देतात. परंतु हा भिक्षेवरील उत्सव असलेने दरवर्षी तांदूळाचे ‘घाटले’ हे पक्वान्न व आंब्याचे गोड लोणचे परंपरेने आठवणीने दिले जाते.
रात्री करमणुकीचे कार्यक्रम ग्रामस्थ मंडळीनी बसविलेले नाटक सादर केले जाते. त्यानतंर लळिताचे कीर्तन होते. कीर्तनाचा पूर्वरंग, हार, बुक्का झालेवर लळिताचा कार्यक्रम सुरु होतो. ‘रत्नजडित सिंहासन, वरी शोभे रघुनंदन’ हे भजन म्हणून श्रीरामाचंद्रांचे (उपरण्यावर काढलेल्या) पादुका दर्शन सर्वांना केले जाते. याचवेळी ‘हरिचे पदवंदा बा पदवंदा’ हे वचन म्हटले जाते. उपस्थितांना चंदनाची उटी लावून तीर्थ दिले जाते. नंतर उत्सवाचा त्यावर्षीचा जो यजमान असेल (14 केळकर घरातील प्रतिनिधी) त्याने बुवांचे उपरण्यात नारळ व तुळशीचा हार घालून देणे तसेच बुवांनी यजमानांचे उपरण्यात नारळ व तुळशीचा हार घालणे. नंतर यजमान व कीर्तनकार यांची गळाभेट होते. सर्व केळकर घराण्यातील प्रमुखांना नारळ व तुळशीहार प्रसाद म्हणून दिला जातो. तो त्यांचा मान आहे. तसेच पेटीवाले, तबलजी, नाटकवाले, लाईटवाले, स्पीकरवाले यांना नारळ व तुळशीहार प्रसाद म्हणून दिला जातो. नंतर आरती घेऊन बुवा कीर्तनाची समाप्ती करतात.
देवळाभोवती एक भोवती घालताना मारुती, तुळस, गरुड, शंकर व देवीची आरती करुन श्लोक म्हणून ‘घालीती पंखा वारा, हरि तुम्ही चला हो मंदिरा’ हे भजन म्हणून देवळात येऊन देवासमोर बसतात. नंतर ‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझीया सकळा हरिच्या दासा’ ही प्रार्थना म्हणून सर्वांनी त्यावर ‘तथास्तू’ म्हणून श्लोक म्हणावयाचा आहे. पुढे विडा म्हटला जातो.
शेवटी कीर्तनकार सर्वांच्यावतीने उत्सव सांगतेची प्रार्थना करतात. खिरापत वाटून उत्सवाची सांगता होते.
प.पूज्य वामन सद्गुरूंची पुण्यतिथी :
ज्येष्ठ शु. षष्ठी या दिवशी प.पू. वामन सद्गुरुंची पुण्यतिथी साजरी केली जाते. सद्गुरुंच्या पादुकांवर देवळात दुधाचा अभिषेक केला जातो. नंतर त्यावर्षीचे उत्सव यजमानाचे घरी केळकर मंडळींना महाप्रसाद दिला जातो.
काकड आरती :
अश्विन शु. प्रतिपदा ते कार्तिक पौर्णिका असा देवाच्या काकड आरतीचा पहाटेचा कार्यक्रम गेली पंचेचाळीस वर्षे अव्याहत साजरा होत आहे.
‘जय जय रघुवीर समर्थ’
अध्यक्ष,
श्री विठ्ठल मंदिर उत्सव मंडळ,
मालगुंड.